
गारगोटी ता. २ (आनंद चव्हाण) भुदरगड तालुक्यातील मिणचे, हेदवडे, फये, म्हसवे या गावासाह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण असलेला फये लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने ३३. ४२ मीटर उंची व ३५५. ६५ मीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाची १३८. ८८ दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक क्षमता आहे. प्रकल्पात पूर्ण पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पांतर्गत ९७२ हेक्टर लाभक्षेत्र असून सिंचन क्षेत्र ७०० हेक्टर आहे. शेतीच्या पाण्यासाठी मोर ओहोळवर बारा बंधारे बांधलेले आहेत. प्रत्येक वर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. यावर्षी प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला. शेतीसाठी जादा आवर्तने देण्यात आली होती. त्यामुळे पाणीटंचाई भासली नव्हती. सध्या हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभ क्षेत्रातील बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गारगोटीपासून हा प्रकल्प १० ते १२ किलोमीटर अंतरावर असतानाही हा प्रकल्प दुर्लक्षित होता. या प्रकल्पावर खासगी सुरक्षारक्षक नेमल्याने व प्रकल्पाच्या सुरक्षेचे खासगीकरण केल्याने तालुक्यातून अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संवेदनशील ठिकाणी बेफिकीर वागणाऱ्या प्रशासनाच्या कृतीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Leave a Reply