

इचलकरंजी प्रतिनिधी –
कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील कु. श्रुतिका गुंडप हिची जपानच्या महिला क्रिकेट राष्ट्रीय संघात निवड झाल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अत्यंत अभिमानाची आहे. अवघ्या १६ वर्षांची श्रुतिका सध्या जपानमधील Indian International School मध्ये इयत्ता ११वीमध्ये शिक्षण घेत आहे. ती Tokyo Titans Cricket Club ची खेळाडू असून तिचे प्रशिक्षण अफरोज खान आणि आशिष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. भारतात तिने Master Cricket Club इचलकरंजी येथे कोच विनय कोपड यांच्याकडून क्रिकेटचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. जपानच्या संघात तिच्याकडे यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून जबाबदारी असेल.
श्रुतिका गेली १० वर्षे जपानमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. तिचे वडील संदीप गुंडप हे केमिकल इंजिनिअर असून जपानमधील कंपनीत कन्सल्टन्ट म्हणून कार्यरत आहेत. तिची आई कोमल गुंडप गृहिणी असून तिची धाकटी बहीणही जपानमध्येच शिक्षण घेत आहे. ‘जपानमध्ये क्रिकेट खेळ अलीकडे सुरु झाल्याने भारतासारख्या क्रिकेट खेळणाऱ्या देशातून इथे आलेल्या खेळाडूंना आणि क्रिकेटची आवड असलेल्या मुलांना खूपच चांगल्या संधी आहेत. येत्या काळात अनेक खेळाडू तयार होतील आणि जपानचे नेतृत्व करतील’ अशी प्रतिक्रिया श्रुतिकाचे वडील संदीप गुंडप यांनी दिली.
श्रुतिकाबरोबर मूळचे मोरगाव, बारामतीचे असलेले श्री. प्रीतम कुदळे यांची कन्या कु. इशिता कुदळे हिची सुद्धा जपानच्या महिला क्रिकेट राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. श्रुतिकाच्या आणि इशिताच्या या यशामुळे कोल्हापूर, इचलकरंजी आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
श्रुतिका शिक्षणात सुद्धा अव्वल
श्रुतिका ही केवळ खेळातच नव्हे तर अभ्यासातही तितकीच उजवी आहे. गेल्या वर्षी १०वीच्या बोर्ड परीक्षेत तिने ९६% गुण मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
जपानमध्ये वाढतेय क्रिकेटची आवड
जपानमध्ये सगळ्या खेळांना विशेष महत्व दिले जाते. जपानमध्ये पूर्वी क्रिकेट हा खेळ फारसा लोकप्रिय नव्हता, पण आता ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे जपानी समाजातही क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे. जपान सरकारकडून याची दाखल घेतलेली असून निधी उपलब्ध करून देणे, मैदान बांधणे अशी पावले उचलली जात आहेत.
Leave a Reply