अमली पदार्थांचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाला निवेदन ; गारगोटी

गारगोटी :

भुदरगड तालुक्यामध्ये अल्पवयीन तरुणांकडून गांजा,चरस यासारखे नशा युक्त अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. निर्मनुष्य, एकांत, अंधाऱ्या, अडकळीच्या ठिकाणी जसे तरुणांच्या कडून याचे सेवन केले जात आहे. तसेच शाळा, कॉलेज सार्वजनिक ठिकाणीही हे प्रकार पाहायला मिळाले आहेत. भुदरगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्रासपणे गांजा सरस अशा अमली पदार्थांचे विक्री होत असल्याचे व मद्य विक्रीच्या अवैध्य व्यवसायातूनही निष्पाप तरुणांना यामध्ये गोवले जात आहे. तरुण पिढीला बरबाद करून नशेच्या आधीन करून गुन्हेगारीकडे वळवले जात आहे. त्यामुळे अनेक गरीब,सामान्य मध्यमवर्गीय व श्रीमंत कुटुंबेही देशोधडीला लागत असल्याचे यातून दिसत आहे. गांजा, चरस अशा पदार्थांचे व्यसन करून अनेक तरुण टोकाची भूमिका घेत असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाजातील वातावरण भयग्रस्त झाले आहे.

भुदरगड तालुक्यातील अनेक घटनांमध्ये या अमली पदार्थांच्या नशेचेच कारण समोर आल्याचे ऐकायला मिळाले आहे. एखाद्या कार्पोरेट कंपन्याच्या प्रशासनाप्रमाणे या अवैध व्यवसायाचे काम सुरू आहे.यावर वेळेत आवर घालून कठोर कारवाई होणे गरजेचे असून प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी. अन्यथा, तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्विकारेल अशा आशयाचे निवेदन पुरोगामी विचारमंच भुदरगड पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने देताना कॉम्रेड सम्राट मोरे यांनी तहसीलदार व भूदरगड पोलीस ठाणे याठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मागील काही दिवसांमध्ये भुदरगड पोलीस ठाण्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कारवाईचे प्रकार झाल्याचे समजते. या व्यवसायातील तस्करांची साखळी मोडीत काढण्याचे व या अवैध व्यवसायाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.व पोलीस खात्याच्या माध्यमातून शाळा, कॉलेज, गावोगावी याबाबत समुपदेशन ही झाल्याची ऐकायला मिळत आहे. पोलीस खात्याच्या माध्यमातून चांगले प्रयत्न होत आहेत. त्यामध्ये काही बंधने व मर्यादा येत असल्याचे ऐकण्यास मिळत आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेतून या मर्यादा व बंधने झुगारून भुदरगड तालुका गांजा, चरस अशा प्रकारच्या अमली पदार्थाच्या सेवनातून तरुणांना मुक्त करून भावी पिढीला चांगले मार्गदर्शन करण्याचे व भावी पिढी सुदृढ घडवण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन पुरोगामी विचार मंच भुदरगड यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाणे गारगोटी व तहसीलदार कार्यालयाकडून मिळाले आहे.

यावेळी जनता दलाचे रवी देसाई मराठा सेवा संघाचे डॉ. राजीव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण, मानसिंग देसाई, स्वराज्य पक्षाचे सतिश जाधव, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कृष्णा भारतीय, शिवाजी कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मायकल बारदेस्कर, प्रहार संघटनेचे मच्छिंद्र मुगडे, सचिन भांदिगरे, सुनिल चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *