
गारगोटी : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनो बारावी परीक्षेत मिळवलेले यश हे तुमच्या मेहनतीचे, चिकाटीचे, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. यशाच्या या टप्प्यानंतर तुम्हाला अधिक कष्ट, जिद्द आणि शिस्तीची आवश्यकता आहे. कारण यशाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी तुम्हाला अभ्यासाबरोबरच संवेदनशीलता, नेतृत्वगुण आणि समाजप्रती जबाबदारी यांचाही विकास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकरअप्पा देसाई यांनी केले.
येथील कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी (कला, वाणिज्य व विज्ञान शाखा) मधील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संचालक डॉ. पी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते.शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाणकर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, प्राचार्य डॉ. यू. आर. शिंदे प्रमुख उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. पी. बी. पाटील म्हणाले, यश ही एक मजल असते, अंतिम मुक्काम नव्हे. शिका, मोठे व्हा आणि माणूसपण जपा. जग वेगाने बदलत आहे. ज्ञान, कौशल्य, मूल्ये आणि नैतिकता या चारही गोष्टींची आता अधिक गरज आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना उंची गाठायला प्रेरणा देणारे शिक्षक हेच खरे यशामागील शिल्पकार असतात. तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कौटुंबिक पाठिंबा हा फार मोठा आधारस्तंभ असतो.
यावेळी श्रीमती लतादेवी कल्याणकर, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, प्राचार्य डॉ. यू. आर. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. एस. बी. देसाई, प्रा. एम. टी. शेंडगे आदी प्रमुख उपस्थित होते. उपप्राचार्य एस. जे. जितकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक संग्राम पाटील यांनी आभार मानले. डॉ. एस. सी. इंगवले, प्रा. एस. एस. वर्णे यांनी सूत्रसंचालन केले.
Leave a Reply